Buldhana Bus Accident :वाणकर कुटुंबीयांनी गमावल्या तीन पिढ्या; मुलगी, आई आणि आजीचा मृत्यू

पिंपरी – समृद्धी महामार्गावरील अपघाताने पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या वाणकर कुटुंबावर घाला घातला आहे. मुलगी, आई आणि आजी अशा तीन पिढ्या या अपघातात दगावल्या आहेत. यामुळे आता प्रणित वाणकर यांच्या कुटुंबात महिला सदस्यच उरलेली नाही. त्यामुळे पिंपळे सौदागरच्या जरवरी सोसायटीत शोककळा पसरली आहे. प्रणित वाणकर यांच्या आई शोभा, पत्नी वृषाली आणि मुलगी ओवी या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
पिंपळे सौदागर येथील जरवरी हौसिंग सोयाटीमध्ये प्रणित विनायक वाणकर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. करोनाने प्रणित यांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हिरावून घेतले. मूलबाळ नसल्याने त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लहान ओवीला दत्तक घेतले. ओवीच्या येण्याने वाणकर कुटुंबामध्ये एक आनंदाची सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त आई शोभा, पत्नी वृषाली ओवीसह चंद्रपूर येथील त्यांच्या गावी गेले होते.
शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी त्या तिघी विदर्भ एक्स्प्रेस या खासगी बसने पुण्याकडे निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली. प्रणित रांजणगावच्या जॉन डियर कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतात. तर, पत्नी वृषाली पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल स्कूलमध्ये काम करत होत्या. ओवीचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी नुकताच नोकरीचा राजीनामा दिला होता, अशी माहिती जरवरी सोसायटीचे अध्यक्ष गौरव नागरे यांनी दिली.
प्रणित वाणकर खूपच मनमिळावू, प्रेमळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. आम्ही दररोज भेटून एकमेकांची विचारपूस करायचो. त्याने ओवीचा वाढदिवस असल्याचे सांगितल्यानंतर सोसायटीच्या वतीने आम्ही केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. 12 मे 2023 रोजी ओवीचा दुसरा वाढदिवस आम्ही सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. या दुर्दैवी घटनेमुळे जरवरी सोसायटीतील प्रत्येक नागरिक दुःखात आहे. प्रणित वाणकर यांच्या कुटुंबीयांत आता एकही महिला सदस्य उरलेली नाही. अतिशय दुर्दैवी घटना घडल्यामुळे या दुःखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या परिस्थितीतून त्यांना सावरण्यासाठी ईश्वर त्यांना ताकद देवो, ही प्रार्थना. अशी भावना सोसायटीचे अध्यक्ष गौरव नागरे यांनी प्रभातशी बोलताना व्यक्त केली.





