Manchar News : तीन पिढ्यांचा रस्त्याचा वाद मिटला
Manchar News : परस्पर सहमतीने मार्ग काढत अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता अखेर खुला करण्यात आला.

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) जवळील वाळुंजवाडी येथील गायकवाडवस्ती,भैय्येवस्ती आणि चौगुलेवस्ती यांच्यातील तब्बल तीन पिढ्यांपासून म्हणजे ५० वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा वाद घोडेगाव येथील नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्या पुढाकाराने आणि मध्यस्थीमुळे अखेर मार्गी लागला.दोन्ही बाजूंची सकारात्मक चर्चा घडवून आणत त्यांनी रस्ता खुला करून नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविल्याने ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून सन्मान केला.
वाळुंजवाडी येथील गायकवाडवस्ती आणि चौगुलेवस्ती यांना जोडणारा रस्ता तब्बल तीन पिढ्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे दोन्ही वस्त्यांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता खुला करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.
वाळुंजवाडीचे सरपंच नवनाथ वाळूंज यांनी या प्रकरणी नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डॉ.सचिन वाघ यांनी दोन्ही बाजूंच्या संबंधितांना एकत्र बोलावून सकारात्मक चर्चा घडवून आणली. परस्पर सहमतीने मार्ग काढत अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता अखेर खुला करण्यात आला.
रस्ता सुरू झाल्याने गायकवाडवस्ती आणि चौगुलेवस्तीतील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला असून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी डोक्यावर ओझे वाहून नेण्याची वेळ येत होती, ती आता टळली आहे. रस्ता खुला करण्यासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल नायब तहसीलदार डॉ.सचिन वाघ,सरपंच नवनाथ वाळूंज यांचा सत्कार उपसरपंच कांताराम कडाळे,मयूर गायकवाड आणि ग्रामस्थांनी करून कृतज्ञता व्यक्त केली.
गेली 50 वर्ष रस्त्याचा वाद होता.रस्त्याच्या वादामुळे मारामाऱ्या झाल्या,पोलीस केस झाल्या,गावात बैठका झाल्या,परंतु रस्त्याचा वाद मिटत नव्हता.त्यामुळे ग्रामस्थांना 500 मीटर रस्त्यासाठी साडेतीन किलोमीटर अंतर जाऊन वळसा घालून जावे लागत होते.रस्त्याचा वाद मिटल्यामुळे 12 फुटी रस्ता तयार झाला आहे. त्यामुळे साडेचारशे ग्रामस्थांची दळणवळणाची समस्या मिटली आहे.
-डॉ.सचिन वाघ,नायब तहसीलदार, आंबेगाव तालुका.




