पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

अकोले, पाथर्डी (प्रतिनिधी) –जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे शेततळ्यात बुडून चुलता-पुतण्याचा, तर पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात बुडून चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला. कार्तिक सुनील गोर्डे (वय 20) आणि अनिल खंडू गोर्डे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव निपाणी- वडगाव लांडगा रोडवर भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला होता. तो पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी चुलते अनिल गोर्डे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदामुळे त्यांनाही बाहेर येता आले नाही. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर घरातील लोकांनी शेततळे फोडून त्यांना बाहेर काढले. अकोले ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले आहे. कार्तिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.
पाथर्डी तालुक्यातील पाडळीत येथील पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या राजेंद्र बाबूराव साळवे या तरुणाचा सायंकाळी बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सध्या पाथर्डी तालुक्यात मुळा धरणातून चारीला पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी पाडळी गावात असलेल्या पाटातून पुढे जात आहे.
राजेंद्र साळवे हा आपल्या काही मित्रांसमवेत गावाजवळ असलेल्या पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याने या पाण्यात उडी मारल्यानंतर तो बाहेरच आला नाही. यानंतर त्याच्या मित्रांनीही या पाण्यात बराचवेळ शोध घेऊनही तो सापडला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाला संपर्क साधत सध्या चालू असलेले मुळा चारीचे पाणी बंद करण्यास सांगितले. हा पाणीपुरवठा बंद केल्या नंतर रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.





