मुंबई-नाशिक महामार्गावर कारमध्ये आढळले कुजलेले तीन मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु

मुंबई : शहापूर तालुक्यातील उंबरमाळी परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. झाडाझुडपांनी व्यापलेल्या भागात नाल्यात कोसळलेली एक कार आणि त्यात आढळलेले तिघांचे कुजलेले मृतदेह पोलिसांसह संपूर्ण गावकऱ्यांना हादरवून गेले. या कारचा अपघात साधारणतः पाच ते सहा दिवसांपूर्वी झाला असावा, मात्र दुर्गम जागा आणि झाडीमुळे हा प्रकार इतके दिवस लक्षात आला नव्हता.
गुरं चारणाऱ्या महिलेमुळे उघड झाला अपघात
गुरं चारण्यासाठी गेलेल्या उंबरमाळी गावातील एका स्थानिक महिलेला झाडीत कार दिसली. कारकडे अधिक लक्ष गेल्यानंतर तिच्या नाकात दुर्गंध पोहोचला. संशय आल्याने तिने कारमध्ये डोकावून पाहिले आणि तिथे तिघांचे कुजलेले मृतदेह असल्याचे लक्षात आले. या धक्कादायक दृश्यानंतर तिने गावकऱ्यांना माहिती दिली आणि तत्काळ कसारा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला.
पोलिसांची तात्काळ कारवाई
कसारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. प्राथमिक तपासात ही कार मुंबईतील अंधेरी-खार परिसरातील असल्याचे समोर आले. कारमध्ये आढळलेल्या मृतांपैकी एका तरुणाची ओळख यज्ञेश वाघेला अशी पटली आहे. इतर दोघांची ओळख अद्याप स्पष्ट होत नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
अपघात की घातपात?
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अपघात कसा घडला, कार नाल्यात कशी गेली, याचा सखोल तपास सुरू आहे. हा केवळ अपघात आहे की यामागे काही घातपाताची शक्यता आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.




