पुणे | अभय योजनेस उरले तीन दिवस ; मुद्रांक शुल्क कमी भरलेल्यांसाठी योजना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन १९८० ते २०२० या कालवधीत दस्तनोंदणीवर मुद्रांक शुल्क कमी भरलेल्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील अभय योजनेस राज्य सरकारकडून दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आली.
ही मुदत आता तीन दिवसांत समाप्त होत आहे, त्यामुळे नागरिकांना या तीन दिवसांत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
१९८० ते २०२० या कालवधीत सदनिका घेतली असेल. परंतु, मुद्रांक शुल्क कमी भरले असेल अथवा १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करारनामा केला,
मात्र रजिस्टर करण्यासाठी दाखल केले नाही अथवा बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये जी रक्कम दाखविली, त्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले असेल, तर अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने ही अभय योजना जाहीर केली होती.
अर्ज येथे करा : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या योजनेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू केली आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोणत्याही प्रकारच्या दस्तासाठी सह जिल्हा निबंधक कार्यालय येथे अर्ज करता येतील शिवाय नोंदणीस सादर दस्तांबाबत त्या-त्या सब रजिस्टर कार्यालयात अर्ज करता येतील.
तर, पिंपरी-चिंचवड मध्ये दापोडी येथील सिद्धी टॉवर, एक विंग, पहिला मजला वरील हवेली क्र.१७ आणि २५ येथे विशेष कक्षात अर्ज करता येणार आहे.





