विश्वनाथ महाडेश्वरांसह तीन नगरसेवकांना अटक ; सोमय्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांची कारवाई

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सौमय्या हल्लाप्रकरणात माजी महापौर आणि काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकणी पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी बोलवले होते. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर, दिनेश कुबल यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या 23 एप्रिलला खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. याप्रसंगी किरीट सोमय्या आल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या वाहनावर बाटल्या आणि चपला फेकल्या. या हल्ल्यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी झाले होते. त्यावेळी विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते. सोमय्यांच्या वाहनचालकाने शिवसैनिकांवर गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे.




