कॅनडातील तीन कॉलेजेस दिवाळखोर घोषित

हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
मॉनट्रीयल: अनेक भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी हवी असते .अनेक विद्यार्थी परदेशात विविध ठिकाणी आपल्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करत असतात. कॅनडामध्ये असा अभ्यास करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे पण आता अचानक कॅनडा सरकारने देशातील तीन महत्त्वाची कॉलेजेस दिवाळखोर घोषित केल्याने तेथे शिक्षण घेणाऱ्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
सरकारने दिवाळखोर घोषित केलेला कॉलेजमध्ये एम कॉलेज सी डी ई कॉलेज आणि सी सी एस क्यू कॉलेज या महत्त्वाच्या कॉलेजेसचा समावेश आहे. या निर्णयानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपण आता काय करावे कळत नसल्याने कॅनडातील भारतीय दूतावासाने याबाबत एका ऍडव्हायझरी प्रसिद्ध केली असून दूतावासाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कॉलेजने गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांवर फी आणि इतर शुल्क त्वरित जमा करण्याबाबत दबाव वाढवला होता.
विद्यार्थ्यांनी याबाबतची पूर्तता केल्यानंतर काही कालावधीतच या कॉलेजेसनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहे. राईसिंग फोनिक्स इंटरनॅशनल नावाच्या कंपनीने या कॉलेजेसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची भरती केली होती. त्यांनी आता या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे धाव घेतली आहे. पण आता या कंपनीने सुद्धा स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आल्याने विद्यार्थी जास्तच काळजीत पडले आहेत.
या कॉलेजेसमध्ये आपल्याला शिक्षण मिळणार नसेल तर आपण जमा केलेली हजारो डॉलरची फी परत मिळावी अशी मागणी आता विद्यार्थी करत असून याबाबत दूतावासाने सहकार्य करावे अशी त्यांची मागणी आहे. भारतीय दूतावासानेही या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याशी संपर्क साधावा त्यांची फी परत मिळवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे.





