Pune Crime: “मीच इथला दादा” म्हणत हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे पोलिसांच्या ताब्यात

पुणे – वस्तीतील दादा असल्याचे सांगत एका तरुणाने कोयता हातात घेऊन धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीमध्ये राडा घातला. त्याने एका व्यक्तीवर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वार चुकल्याने चिडून जाऊन त्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने तब्बल सहा गाड्यांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले.
कृष्णा सुभाष वैराळ (19, रा.संतोषनगर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. तो दहावीत शिक्षण घेतो तर त्याचा अल्पवयीन साथीदार अकरावीत शिक्षण घेतो. याप्रकरणी सचिन भोसले (36,रा.शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कृष्णा हा पुर्वी शंकर महाराज वसाहतीमध्ये रहात होता. त्यावेळी त्याचे फिर्यादी सचिन भोसलेबरोबर वाद झाले होते. याचा राग त्याच्या मनात होता. बुधवारी तो त्याच्या अल्पवयीन साथीदारासह कोयता घेऊन शंकर महाराज वसाहतीमध्ये आला. तेथे सचिन यास मला घाबरुण रहायचे, मी वस्तीचा दादा आहे असे म्हणत कोयत्याने त्याच्यावर वार केला. मात्र सचिन यांनी वार चुकवून घरात पळ काढला.
यानंतर दोघा आरोपींनी सचिन यांच्या दुचाकीवर कोयत्याने वार करत नुकसान केले. तसेच जाताना वस्तीतील पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनाची तोडफाड केली. यामध्ये वाहनांचे सुमारे 21 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. यानंतर हातात शस्त्र घेत रागाच्या भरात “मीच इथला दादा आहे’ असे म्हणत परिसरात दहशत माजवली. त्यांच्या दहशतीला घाबरुण घराबाहेर कोणीच आले नाही. ते गेल्यावर सर्व नागरिक मिळून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बेरड करत आहेत.





