Threatening E-mail : धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयात खळबळ
Threatening E-mail :

न्यायालयीन कामकाजावर परिणाम; पक्षकार, वकिलांना काढले बाहेर
Threatening E-mail : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर आल्याने सकाळी सव्वाअकराच्या सुमारास न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.
खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले, तसेच संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांना तातडीने न्यायालय आवाराच्या बाहेर काढण्यात आले.
न्यायालय प्रशासनाने ई- मेलची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांसह बाॅम्ब शोधक- नाशक पथक न्यायालयात दाखल झाले. सुरक्षिततेचा उपाय म्हणून वकील, पक्षकारांना न्यायालयाबाहेर काढले. न्यायालयाशेजारी असललेल्या मेट्रो स्थानक येथेही बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला होता. त्यामुळे न्यायालयासह शेजारील मेट्रो स्थानक परिसराची कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही बॉम्बसदृश वस्तू सापडली नाही.
दुपारी अडीचच्या सुमारास नागरिकांना बाहेर काढले होते. त्यानंतर दुपारी ४ नंतर सर्व सुरळीत असल्याचे यंत्रणेने सांगताच पक्षकार, वकिलांना न्यायालय आवारात सोडण्यात आले.
सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळपर्यंत तपासणी सुरू होती, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले. धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठविला, याचा तपास सुरू असून, बॉम्बशोधक पथकाच्या तपासणीनंतरच पुढील परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
आजच्या प्रकरणांना पुढील तारीख Threatening E-mail :
धमकीच्या ई-मेलमुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाल्याचा परिणाम दिवसभरातील सुनावण्यांवर झाला. सोमवारी (दि. २) सुनावणीसाठी निश्चित असलेल्या प्रकरणांचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे या प्रकरणांना पुढची तारीख देण्यात आली.
वाहतूक कोंडी Threatening E-mail :
अचानक न्यायालय परिसर रिकामा करण्यात आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. वकील, पक्षकरांनी त्यांच्याकडील गाडीसह बाहेर जाण्यास पसंती दिली. याचा परिणाम परिसरातील वाहतुकीवर झाल्याने कोंडी निर्माण झाली.





