Navneet Rana : खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा एकदा आले धमकीचे पत्र

अमरावती : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना आज पुन्हा एकदा धमकीचे पत्र आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन दिवसांपूर्वीच याच व्यक्तींने पत्राद्वारे नवनीत राणा यांना धमकी दिली होती. आता दुसऱ्यांदा असे पत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमिर नावाच्या व्यक्तीने पत्राद्वारे ही धमकी दिली आहे. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीय. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील येथील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख करण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल
या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस हैदराबादमध्ये दाखल झाले असताना आज परत दुसरं धमकीचं पत्र नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या घरी आले आहे. हे प्रकरण उजेडात येताच अमरावती पोलीस नवनीत राणा यांच्या घरी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.





