ठाणे – शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. त्यासाठी “चलो अयोध्या’ असा नारा दिल्याने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली. त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दौऱ्याने घरात बसणाऱ्यांना बाहेर पडावे लागले, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आपल्या दौऱ्यामुळे सर्वच जण कामाला लागले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, अयोध्येत प्रभु रामाचे मंदिर व्हावे आणि ते स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 8 वरून शुक्रवारी दुपारी 4 वाजता अयोध्या येथे विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याने दोन वाजल्यापासून शिवसैनिकांनी स्थानकात गर्दी केली होती. यावेळी डोक्यात भगव्या रंगाची टोपी आणि पांढऱ्या रंगाचा टीशर्ट असा पोषाख परिधान केले शिवसैनिक पाहण्यास मिळत होते. यावेळी त्यांच्या समेवत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, बालाजी किणीकर, मिनाक्षी शिंदे आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.