Pune District : फिर्यादी, स्वच्छता निरीक्षकांचीच कसून चौकशी करा; शिरूरमधील पाइप चोरीप्रकरणी बांडे यांची मागणी
Pune District : विक्री स्वतःच करायची आणि नंतर चोरी झाल्याचा बनाव करून पोलीस व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.

शिरूर : शिरूर नगरपरिषदेतील कथित पाइप चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरूर नगरपरिषद हद्दीतील मुख्य जलवाहिनी तसेच बंद करण्यात आलेल्या पाइपलाइनमधील जुने पाइप चोरीला गेल्याची लेखी तक्रार नगरपरिषद प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. मात्र, हा प्रकार संशयास्पद असून, नगरपरिषदेतील काही अधिकारी संगनमताने अनेक वर्षांपासून भंगार साहित्याची विक्री करत आहेत. विक्री स्वतःच करायची आणि नंतर चोरी झाल्याचा बनाव करून पोलीस व जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप निवेदनात केला आहे.
निवेदनात २०२२ आणि २०२६ मधील दोन गुन्ह्यांचाही उल्लेख केला आहे. २४ जून २०२२ रोजी सेंटर शाळेतील बंद खोलीतील भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याच काळात सेंटर शाळेच्या मोकळ्या जागेतील ४० लाख रुपयांच्या भंगार विक्री घोटाळ्याप्रकरणी सततच्या पाठपुराव्यानंतर १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे.
सर्व प्रकरणांमागे नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या पाइपचोरी प्रकरणासह यापूर्वी दाखल झालेले दोन्ही गुन्हे, संबंधित तक्रारी, संपूर्ण भंगार व्यवहाराची एकत्रित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रकरणासंदर्भात ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षक सुनील फुलारी यांनाही यापूर्वी निवेदन देऊन संबंधित व्यक्तींची नावे व अन्य माहिती सादर केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तक्रारदारांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, कसून चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिरूर पोलिसांकडे केली आहे.





