Thorandale Murder : थोरांदळे खून प्रकरणाचा छडा! सराईत गुन्हेगार जेरबंद; ४ मोठे गुन्हे उघड
Thorandale Murder : थोरांदळे येथील दामोदर मिंडे यांच्या खून प्रकरणी सराईत गुन्हेगार कबीर काळेसह एकाला अटक; तपासात ओतूर, घोडेगाव आणि नाशिकमधील ४ गुन्हे उघडकीस.

Thorandale Murder – मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थोरांदळे (ता.आंबेगाव) येथे दामोदर जयराम मिंडे (वय ६२) यांचा खून करून घरात चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून जबरी चोरी, खून, दरोडा, असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी मंचर पोलीस ठाणे हद्दीत थोरांदळे येथील पाईनमळा येथील दामोदर जयराम मिंडे यांचा त्यांच्या शेतातील घरात अज्ञात चोरट्यांनी डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला. त्यानंतर सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेण्यात आला होता.
याबाबत त्यांची मुलगी गीतल गावडे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयितांची ओळख पटली.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) परिसरात सापळा रचून आरोपी कबीर उबऱ्या काळे (वय २४, रा. पुणेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. कुरणगाव, ता. श्रीगोंदा) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकालाही पोलिसांनी रविवार दि.५ रोजी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपी कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर व पुणे ग्रामीण भागात दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे एकूण ९ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.तसेच पुढील तपासात आरोपींनी ओतूर, घोडेगाव, मंचर व दिंडोरी (जि. नाशिक) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेले आणखी चार गुन्हे उघडकीस आले आहेत.अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
तीन दिवस कोठडी
आरोपींना न्यायालयात हजर केले असता ११ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.पुढील तपास सुरू आहे.






