Thomas and Uber Cup 2022 : उबेर चषकातील भारताचे आव्हान संपुष्टात

बॅंकॉक – भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला रत्चानोक इंतानोनकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव पत्करावा लागला. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी थायलंडकडून 0-3 असा पराभूत झाल्याने भारतीय महिला बॅडमिंटन संघाचे उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या गटात जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला 59 मिनिटांच्या लढतीत आठव्या क्रमांकावर असलेल्या इंतानोनविरुद्ध 21-18, 17-21, 12-21 असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सिंधू आता हेड-टू-हेड रेकॉर्डवर 4-7 ने पिछाडीवर आहे.
महिला दुहेरीच्या गटात श्रुती मिश्रा आणि सिमरन सिंघी या जोडीला जोंगकोलफान कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजाई या थायलंडच्या जोडीकडून 16-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारत 0-2ने अशी पिछाडीवर गेला.
दुसऱ्या एकेरीच्या अन्य लढतीत पोर्नपावी चोचुवॉंगविरुद्ध 16-21, 11-21 असा शरणागती पत्करणाऱ्या आकार्षी कश्यपनेही निराशा केल्याने थायलंडने 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली.
दरम्यान, सिंधूला बुधवारी भारताच्या अंतिम गट डी सामन्यात जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या एन सेयुंगविरुद्ध 15-21, 14-21 असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला, जिथे कोरियाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला होता.





