पुणे- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) 25 ऑगस्ट रोजी होत आहे. याच परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करावा, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी नवी पेठेत रात्री नऊ वाजता ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आयोजनाची पूर्वा तयारी झाली आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याचे एमपीएससीने आज परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी शेकडो उमेदवारांची उपस्थिती होती. याप्रसंगी उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थी आंदोलनकर्ते संख्या पाहून आंदोलनस्थळी पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या. पोलिसांनी शांततेत आंदोलन करण्याची सुचना केली आणि कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहनही केले. कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी गट अ आणि गट ब मधील मंजूर 258 पदांची जाहिरात प्रसिद्ध करून या पदांचा समावेश 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेत करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली. तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आयोगाने तसे शक्य नसल्याचे नमूद केले आहे.