पंढरपूर -करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी साप्रंदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदा आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसेसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले. मंदिर समितीने महापूजा पार पाडताना योग्य नियोजन करावे. करोनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. शासकीय पूजेस येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. महावितरण विभागाने वीजपुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी.