Champions Trophy 2025 Final : हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर ९ मार्चला…! गौतम गंभीरने फायनलपूर्वी दिला इशारा

Champions Trophy 2025 Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरही कोच गौतम गंभीरच्या मते, टीम इंडियाने अद्याप “परफेक्ट गेम” दाखवलेला नाही. गौतम गंभीर म्हणाला की, रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात परफेक्ट गेम पाहायला मिळण्याची आशा आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव करत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले त्याला चेस मास्टर का म्हणतात. त्याने या विजयात ८४ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गौतम गंभीर म्हणाला काय म्हणाला?
या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कोच गौतम गंभीर म्हणाला की, ‘आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये तुम्हाला सातत्याने चांगले प्रदर्शन करायचे असते. त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकत नाही की, तुम्ही हा पूर्णपणे परिपूर्ण खेळ खेळलात. आमची कामगिरी अजून परिपूर्ण झालेली नाही. म्हणून मी या कामगिरीवर समाधानी नाही.’ ९ मार्च रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ असे करू शकेल अशी आशा त्याने व्यक्त केली.
आम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करायचीय – गौतम गंभीर
गौतम गंभीर पुढे म्हणाला, ‘आम्हाला अजून एक सामना खेळायचा आहे. आशा आहे की तो एक परिपूर्ण खेळ असेल. आम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करायची आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर निर्दयी पण मैदानाबाहेर नम्र राहायचे आहे.’ भारताने चार फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवणे, अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर आणि केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे असे धाडसी निर्णयही घेतले. बाहेरून ते अतार्किक वाटत असले तरी, गंभीरसाठी खेळाडूंना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ठेवून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी रणनीतीत हा थोडासा बदल आवश्यक आहे.
कम्फर्ट झोनबद्दल गौतम गंभीरचे वक्तव्य –
कम्फर्ट झोनबद्दल बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ‘क्रिकेट म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आहे. अशाप्रकारे तुमची भरभराट होते. जर प्रत्येकजण कम्फर्ट झोनमध्ये राहिला तर जडत्व येईल. आमच्या ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर राहतो, मग तो कोचिंग स्टाफ असो किंवा खेळाडू, आणि आम्ही भारतीय क्रिकेटसाठी जे महत्त्वाचे आहे ते करत राहू. तसेच मला वर्तमानात जगायला आवडते आणि सध्या माझे संपूर्ण लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर आहे.’





