यंदा पालिकेलाच करावी लागणार नाल्याची सफाई

कंपन्या बंद असल्याने “सीएसआर’ फंड घेण्यात अडचणी
पिंपरी – पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. छोट्या नाल्यांची सफाई महापालिका कर्मचारी करतात. तर मोठ्या नाल्यांची सफाई कंपन्यांच्या सीएसआर फंडातून केली जाते. मात्र सध्या करोनामुळे कंपन्या बंद असल्याने महापालिकेला स्वतःच या नाल्यांची सफाई करावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात 202 नाले आहेत. त्यातील 127 छोटे नाले तर 66 मोठे नाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई केली जाते. 127 नाल्यांमधील गवत व कचरा काढण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी दैनंदिन काम सांभाळून करतात. मात्र मोठ्या नाल्यांची सफाई करताना अनेक अचडणी येतात. या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी जेसीबीची आवश्यकता असते. महापालिकेकडे स्वतःचे जेसीबी नसल्याने हे काम पूर्वी निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारामार्फत केले जात असे. ठेकेदार राजकीय पक्षाशी संबंधित असला की नालेसफाईची कामे अर्धवट केली जात असे. पावसाळ्यात नाल्यातील कचरा वाहून गेल्यावर त्याचे फोटो काढून ठेकेदार बिल घेत असे.
मात्र गेल्या काही वर्षांपासून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी निविदा काढणे बंद केले आहे. शहरातील काही कंपन्यांना संपर्क करून नालेसफाईसाठी जेसीबी, कामगार व अन्य साधन सामुग्री या कंपनीकडून घेतली जात आहे. यामुळे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागत नाही.
साधारणतः मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरवातील महापालिका येथील कंपन्यांना पत्र पाठवून सीएसआर फंडातून नालेसफाई करण्याबाबत विनंती करीत असे. मात्र करोनामुळे 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशासह पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन आहे.
हे लॉकडाऊन वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जर कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन नालेसफाई केली तर ही नालेसफाई पूर्ण होण्यास जून अखेर उजाडण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका यंदा स्वतःचे पैसे घालवून नालेसफाई करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी अल्प मुदतीची निविदा काढावी लागणार आहे. जर नालेसफाई वेळेवर पूर्ण झाली नाही तर नागरी वस्तीत नाल्यातील पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.





