पुणे | अविनाश भट सरांकडून ही बातमी…आजची बातमी घ्यावी..

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अर्हम फाउंडेशनच्या वतीने अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास सहायक पोलीस आयुक्त नंदा पाराजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेच्या सदस्या राजश्री पगारिया, प्रीती पगारिया व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश भोसले उपस्थित होते.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील महिला सफाई कर्मचारी जयश्री जिनवाल, कुसुम रोकडे, आरिफा पठाण, सुनीता शिर्के, विमल साळवे, पूनम पाटोळे आणि रंजिता जेधे यांचा मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला, तसेच महाविद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचाही गुलाबपुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पाराजे यांनी स्त्रियांचे समाजातील बदलते स्थान व भूमिका, महिलांचे अधिकार आणि कायदे यावर प्रकाश टाकला. कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता व होणारे शोषण रोखण्यासाठीचे उपाय याबद्दलही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी महिला सफाई कर्मचारी कुसुम रोकडे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना समाजात आदराची वागणूक मिळत नाही, अशी खंत बोलून दाखवली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. इंद्रजित केंद्रे यांनी केले, तर क्रीडा संचालक प्रा. प्रसाद तिकोने यांनी आभार मानले.




