पिंपरी – बांधकाम खर्च सातत्याने वाढत आहे. येत्या काळात घरे आणखी 10 ते 15 टक्के महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या घर घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मत यशदा ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे यांनी केले आहे. दैनिक “प्रभात’च्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयात गणरायाच्या आरतीसाठी आलेल्या यशदा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष वसंत काटे यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. यशदा ग्रुपबद्दल सांगताना ते म्हणाले की, आज यशदा हा ब्रॅंड म्हणून प्रस्थापित झाला आहे. त्यामागे गेल्या 20 वर्षांचे प्रयत्न आहेत. घरांचा दर्जा, पारदर्शक व्यवहार, वेळेत घरांचे वाटप या बाबींमुळे यशदाने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच गृहप्रकल्प बांधून ताब्यात दिल्यानंतरही आम्ही ग्राहकांच्या तक्रारी निवारणासाठी तब्बल पाच वर्ष सुविधा देतो. त्यामुळेच आमच्या घरांना नागरिकांची दिवसेंदिवस पसंती मिळत असून यशदा हा एक ब्रॅन्ड नावारूपाला आल्याचे यशदा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष वसंत काटे यांनी सांगितले. दस्त नोंदणीचा निर्णय स्वागतयोग्य राज्य सरकारने बांधकाम व्यावसायिकांकडेच दस्त नोंदणीचा निर्णय घेतला आहे, याबाबत सांगताना काटे म्हणाले, हा निर्णय चांगला असून याचे मी स्वागत करतो. ग्राहकांना दस्त नोंदणीसाठी दस्त नोंदणी कार्यालयात दिवसभर थांबावे लागत होते, त्यांची पिळवणूक होत होती. बांधकाम व्यावसायिकांकडे दस्त नोंदणी आल्यामुळे ग्राहकांना दस्त नोंदणी ही त्वरीत होणार आहे. बजेट, लक्झरी दोन्ही घरांना मागणी बांधकाम क्षेत्राला सध्या चांगले दिवस सुरू आहे. लक्झरी ऑणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतील अशा घरांची मोठी मागणी आहे. सुरूवातीला 1 बीएचकेला नागरिकांची मागणी होती. आता 1 बीएचके घेणारा ग्राहक भविष्याचा विचार करून 2 बीएचके आणि 3 बीएचके फ्लॅट घेत आहे. तसेच व्यावसायिक गाळांनाही मागणी आहे, असेही वसंत काटे यांनी सांगितले. रेरामुळे ग्राहकांना फायदा घरांना दिवसेंदिवस मागणी वाढत असताना रेरा कायद्या संदर्भात बोलताना वसंत काटे म्हणाले, रेरा आल्यापासून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेरामुळे पारदर्शकपणा वाढला असून गृह प्रकल्पाचे मंजूर झालेले प्लॅनची कागदपत्रे रेराला अपलोड करावी लागतात. तसेच ग्राहकांचे पैसेही त्या खात्यावर येतात. रेरा नसतानाही आम्ही त्याप्रमाणेच काम करत होतो, त्यामुळे रेराचे आम्ही स्वागतच करतो, असेही काटे म्हणाले. परवडणारी घरे सर्वसाधारण ग्राहकांच्या खिशाला परवडतील, असे प्रकल्प यशदा ग्रुपकडून उभारण्यात येत आहे. मोशी, डुडूळगाव या भागात आमचे काम सुरू आहे. यशदा सुप्रीम हा नवीन प्रकल्प आम्ही ग्राहकांसाठी लॉन्च केला होता. यालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 1100 फ्लॅटमधील शुभारंभाप्रसंगीच 450 फ्लॅट बुक झाले होते. लक्झरी घरांप्रमाणेच ग्राहकांना परवडतील, अशा घरांवर आम्ही सध्या काम करत असल्याचे यशदा ग्रुपचे अध्यक्ष वसंत काटे यांनी सांगितले.