#ganeshotsav2023 : पुण्यात गेली दहा दिवस भक्तीमय वातावरण, उत्साह निर्माण करणाऱ्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे. सकाळी 10 वाजतापासून शहरात विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे विसर्जन शहरात सुरु आहे. दरम्यान, या सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आज एका पुणेरी पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुण्यातील अथर्व सुदामे या रिलस्टारने गणेश विसर्जन मिरवणुकीत म्हणजेच मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मित्रांबरोबर सहभागी घेतला. इतकेच नाही तर त्याने पुणेरी शैलीत अनोखा संदेशही दिला. गुलालची उधळण करत गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. गुलालाने माखलेला रीलस्टार अथर्व सुदामे त्याच्या पवन वाघुलकर,डॅनी पंडित व इतर मित्रांसह मिरवणुकीत सहभागी झाला. या वेळी ‘ही श्रींची मिरवणूक आहे, बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका’ अशी पुणेरी पाटी हातात घेऊन रिल्सस्टार पवन वाघुलकरने खास पुणेरी शैलीत संदेशही दिला. पवन व अथर्व यांच्या पुणेरी पाटीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. दरम्यान, आता पुण्याचे मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन होत आहे.