शेअर बाजार घसरून पुन्हा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचण्याचं ‘हे’ एक महत्वाचं कारण

मुंबई – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक वाढली असतानाच खनिज तेलाचे दर 20 महिन्याच्या निचांकावर गेले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजाराचे निर्देशांक वाढून चार महिन्याच्या उच्चांकावर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 294 अंकांनी वाढून 80,796 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सलग दुसर्या दिवशी 114 अंकांनी म्हणजे 0.47 टक्क्यांनी वाढून 24,461 अंकावर बंद झाला.
कंपन्यांची स्थिती
अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरचा भाव 6.19 टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर अदानी समूहातील इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. बजाज फिन्सर्व, महिंद्रा, ईटर्नल, पावर ग्रिड, आयटीसी, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले. तर कोटक महिंद्रा बँक. स्टेट बँक. अॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँकेच्या शेअरच्या भावात घट झाली.
जागतिक परिस्थिती
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग येथील शेअर बाजार बंद होते, युरोपियन शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते, तर अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 2,769 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. या गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यात आतापर्यंत 3,423 कोटी रुपयांच्या शेअर्स खरेदी केली आहे. गेल्या तीन महिन्यात प्रथमच एप्रिल महिन्यामध्ये या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याऐवजी खरेदी केली.
जानेवारीत या गुंतवणूकदारांनी 78,027 कोटी रुपयांची, फेब्रुवारीत 34,574 कोटी रुपयांची तर मार्च महिन्यात 3,973 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. त्यामुळे निर्देशांकावर परिणाम झाला होता. बँकिंग क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले.


