ही देशासाठी धोक्याची घंटा, सरन्यायाधीशांसोबतच्या घटनेवर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मुंबई : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशात खळबळ उडाली असून अनेकांनी याबाबत संंताप सुद्धा व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा लोकशाही आणि संविधानासाठी धोक्याचा इशारा असल्याचे म्हणत घडलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.
शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत सरन्यायाधीशांवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.
आपल्या देशात पेरले जाणारे विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो, असे त्यांनी म्हटले आहे.





