गुलामगिरी व दहशतमुक्तीसाठी ही लढाई

संगमनेर – मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार असून, संगमनेरप्रमाणे स्वातंत्र्याचे व आनंदाचे वातावरण राहाता तालुक्यात निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरी व दहशतीतून मुक्त करण्यासाठी ही लढाई असल्याने यामध्ये सर्व जनतेने सहभागी होऊन प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन करताना आश्वी खुर्द येथील ऐतिहासिक सभा परिवर्तनाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
आश्वी खुर्द येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते .यावेळी रिपाइं नेते बाळासाहेब गायकवाड, डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे सचिन कोते, बापूसाहेब भवर, तात्यासाहेब गायकवाड, मिलिंद कानवडे, सचिन चौगुले, सोनल जगताप, प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ,अर्चना भूसाळ, नामदेव शिंदे, प्रमोद बोंद्रे ,रामनाथ तांबे, दिपाली वर्पे, गणपतराव सांगळे, विक्रम थोरात, राजेंद्र चकोर, अशोक वाणी,अशोक जोशी, विवेक तांबे ,गणेश जोरी आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभावती घोगरे म्हणाल्या की, निवडणुका आल्या की सत्ताधारी अगदी डांबरी रस्त्यावर सुद्धा मुरूम टाकतात. कुटील आणि कारस्थाने असे विखे घराणे आहे. आमदार थोरात यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी साधी गृहिणी असून राहता तालुक्यातील दहशतवाद संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठबळावर उभी असून, सर्वांनी मोलाची साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की ,मी न्याय मागायला गेले आणि माझ्यावरच केसेस टाकल्या. जे माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. हा कुठला सत्तेचा गैरवापर आहे. सत्ता येते आणि जाते मात्र जनता आपली असते. 28 गावे जसे आमदार निवडून आणू शकतात, तसे आमदार पाडू शकतात. यावेळेस सर्वांनी दहशतीतून मुक्तीसाठी घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.





