हा गौरव संपूर्ण मतदारांचा ! आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केली मतदार, मित्र परिवार आणि कुटुंबाप्रति कृतज्ञता

हडपसर : हा गौरव माझा एकट्याचा सन्मान नसून मला निवडून देणाऱ्या तमाम मतदारांचा गौरव आहे ,असे मी मानतो. मी हा पुरस्कार माझे वडील स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे, माझ्या आई लिलावती विठ्ठल तुपे आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे माझे सर्व कुटुंबीय, माझा तुपे परिवार, माझे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्र परिवार आणि हितचिंतक तसेच मतदार संघातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना कृतज्ञता पूर्वक नम्र भावनेने अर्पण करतो.अशी भावना आमदार चेतन तुपे पाटील यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते आमदार चेतन तुपे पाटील यांनी स्विकारला.
या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट
पुरस्काराने विश्वास आणि जबाबदारी आणखी वाढली आहे! हा पुरस्कार स्वीकारताना, हडपसर मतदार संघातील नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी आता वाढली असून त्यासाठी अधिक जोमाने काम करावे लागणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. हीच भावना आणि आपल्या विश्वासाची प्रेरणा घेऊन मी त्यासाठी कायम प्रयत्नशील राहील अशी या निमित्ताने आपणा सर्वांना ग्वाही देतो. माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या मतदार संघातील जनतेचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मी सदैव ऋणी आहे.
चेतन तुपे पाटील (आमदार, हडपसर विधानसभा)





