पुणे | ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – “मागील काही वर्षांत सर्वसामान्य जनतेचा भाजपने अपेक्षाभंग केला आहे. तर, राज्यात ज्याप्रकारे सरकार बनले आहे त्याबद्दलही जनतेच्या मनात चीड आहे. हे वातावरण पाहता आता निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे,’ असे प्रतिपादन काॅंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी केले.
काॅंग्रेस – इंडिया आघाडीचे पुण्याचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचाराच्या सांगता समारंभाच्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, उल्हास कदम आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले, “पुण्यातील वातावरण धंगेकर यांच्यासाठी चांगले आहे. ते लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपकडून यंत्रणेच्या होत असलेल्या गैरवापराबद्दल जनतेत चीड आहे.’
जोशी म्हणाले, “महाविकास आघाडीने सहा विधानसभा मतदार संघात ३७ पदयात्रा घेतल्या. तसेच चौक सभा आणि कोपरा सभाही घेतल्या. जाहीरनामा घरोघरी पोहचवला. नागरिकांचा प्रतिसाद बघता कॉंग्रेसचा विजय निश्चित आहे.
आम्ही भाजपच्या बालेकिल्ल्यात विधानसभा पोटनिवडणूक जिंकली, तेव्हाच लोकसभेचाही गड जिंकणार हे निश्चित झाले होते. आम्ही प्रचाराची पातळीही चांगली राखली. राहुल गांधींच्या सभेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पुणेकरांनी पाहिला आहे. राहुल गांधी यांच्या भाषणात भविष्यातील पंतप्रधान कसा असावा, याचे प्रतिबिंब दिसले.’
उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काय झाले, हे आपण पाहिलेच आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे तसेच पुण्यातही भाजपचेच दोन खासदार आहेत. तरीही विकासाला खिळ का बसली ? हा प्रश्न नागरिकांनी विचारावा.’





