पिंपरी | ही निवडणूक अपप्रचार करणाऱ्यांची होती – बारणे

लोणावळा, (वार्ताहर) – देशहितासाठी आणि देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांची ही निवडणूक न्हवती तर अपप्रचार करणाऱ्यांची ही निवडणूक होती. समाजात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि फूटीरतेची भावना पेरण्याचे काम विरोधी पक्षाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात केले.
तसेच एनडीए 400 पार गेल्यास संविधान बदलले जाणार हा अपप्रचार मतदारांमध्ये पसरवण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले. त्यामुळे एनडीए आघाडीला अपेक्षित यश नाही असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे केले.
सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांचा महायुतीच्या वतीनं लोणावळ्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार बारणे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर,
शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भोईर, मनसेचे शहराध्यक्ष भरत चिकणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्यासह महायुतीचे अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदारांनी काम केले पण…
गेल्या काही दिवसांपासून आमदार विरुद्ध खासदार असा सामना मावळमध्ये दिसून येत असताना याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. खासदार बारणे म्हणाले की, माझं काम महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रामाणिकपणे केलं.
मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी देखील प्रामाणिकपणे काम केले. माझ्यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि हे सर्वांना माहीत आहे.





