जगातील ‘या’ देशाने आता महिलांपासून सजण्याचा अधिकार घेतला काढून; एका महिन्यात पार्लर बंद करण्याचे दिले आदेश

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यापासून महिलांविषयीचे निर्बंध कडक करण्यात येत आहेत. तालिबानने आता देशातील महिलांच्या ब्युटी पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान सरकारने आता महिलांचा नेतिक अधिकार म्हणजे सजण्याचा अधिकारही हिरावून घेतला आहे. देशातील सर्व ब्युटी पार्लरवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच हे सर्व पार्लर बंद करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
तालिबानने नवा आदेश जारी करत अफगाणिस्तानमधील सर्व ब्युटी पार्लर बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमधील सर्व ब्युटी सलून आता एका महिन्याच्या आतमध्ये बंद करावे लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने 25 जुलै रोजी जाहीर केले की, देशातील सर्व ब्युटी पार्लर एका महिन्याच्या मुदतीत बंद करण्यात येतील.
तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर या ठिकाणच्या महिलांचे जगणे कठीण केले आहे. महिलांवर विविध कठोर नियम लादण्यात आले आहेत. आधी स्त्रिया आणि मुलींच्या शिक्षणाचा अधिकार तालिबानने काढून घेतला. महिलांच्या शिक्षणावर बंदी घातल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर महिलांच्या नोकरीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करत त्यांच्या हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेतले. त्यानंतर आता तालिबानने महिलांचा नटण्याचा अधिकारवर बंदी घातली आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये जगात मोठी घटना घडत अफगाणिस्तानाच्या सत्तेच्या खुर्चीवर तालिबानी लोक विराजमान झाले. त्यानंतर सत्तेत येताच तालिबान्यांनी आपल्या जुन्या कायद्यांची अंमलबजावणी सुरु केली. सर्वात अगोदर महिलांना आणि विद्यार्थिनींना टार्गेट केले आहे. महिलांवर एकापोठापाठ एक निर्बंध आणले आहेत. तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध करण्यात आला. अमेरिकेसह अनेक देशांकडून यावर प्रतिक्रियाही आली आहे. येथील महिलांनी अनेक देशांकडे मदतीसाठी विनंती देखील केली आहे. कोणता देश यासाठी पुढाकार घेणार आणि येथील परिस्थिती कधी बदलणार याकडे त्याठिकाणच्या महिला आजदेखील डोळे लावून बसल्या आहेत.





