“हे संविधान रिकामे नाही, ते वाचले नाही म्हणून…”; राहुल गांधींचा PM मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहचला आहे. यासाठी सर्वच राजकीय नेत्यांच्या विविध जिल्ह्यातील दौऱ्यांनी जोर धरला आहे. आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची गुरुवारी नंदुरबार येथे सभा झाली. यावेळी त्यांनी महायुती सरकारसह भाजपवर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे, पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकामं वाटतं. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची विचारसरणी, बुद्ध देवाची, फुले, आंबेडकरांची विचारसरणी आहे. गांधींच्या विचाराचा, हा भारत आहे. ते रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात,” अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
संविधानाच्या रंगावर झालेल्या हल्ल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “ते म्हणतात की मी राज्यघटनेचे लाल पुस्तक सभांमध्ये दाखवतो. पण मी म्हणतो की संविधानाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ लाल आहे की अन्य रंगाचे आहे, त्यात काय लिहिले आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. कव्हरच्या रंगाने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यामध्ये काय लिहिले आहे, त्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, आदिवासी म्हणजे या देशाचे पहिले मालक आहेत. परंतु भाजपवाले म्हणतात तुम्ही वनवासी आहात. वनवासी म्हणजे जल, जमीन आणि जंगलावर अधिकार नसणे. जमीन अधिग्रहण बिल, पेसा कायदा कुणी आणला होता, हे बघितलं पाहिजे. या बिलांमुळे जंगल, जमीन आणि पाण्याचा अधिकार आदिवासींना दिला. भाजपचं सरकार येताच तुमचे अधिकार हिसकावून घेतले. देशामध्ये ८ टक्के आदिवासींची संख्या आहे. ९० पैकी केवळ एक आदिवासी ऑफिसर आहे. त्या अधिकाऱ्याच्या हतात काहीही नाही. त्याला मागे खेचलं जात आहे.”
राहुल गांधींचे आवाहन
“एवढंच नाही तर मोठमोठ्या कंपन्या, मीडिया हाऊसेसमध्ये, उद्योग, व्यवसायामध्ये आदिवासींना संधी मिळत नाही. दिवासींना संधी मिळाव्यात यासाठी मी काम करणार आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर आदिवासींचं कर्ज माफ करणार आहे. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे. याशिवाय बसही मोफत दिली जाईल. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन त्यांनी केलं.
..म्हणून येथील तरुण बेरोजगार
यादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार येथील प्रकल्प इतर राज्यात पाठवते, त्यामुळे येथील लोकांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागते. महाराष्ट्र सरकारने सुमारे ५ लाख नोकऱ्या हिसकावून घेतल्याने येथील तरुण बेरोजगार आहेत,” असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.





