करोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये ! त्याआधी लसीकरणाचे शिवधनुष्य पेलणे भारताला अवघडच

नवी दिल्ली – करोना लसीकरण पाच एप्रिलला सर्वोच्च करण्यात आले. त्या दिवशी 43 लाख 966 जणांना लस देण्यात आली. त्या दिवसाने प्रत्येक पात्र भारतीयाला लवकरात लवकर लस देऊन करोनामुक्त भारताचे स्वप्न पाहिले गेले. त्यातून एक मेपासून 18 ते 45 वर्षाखालच्या गटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली. मात्र, मे महिन्याची सुरुवात होताच या आशेवर पाणी फिरण्यास सुरुवात झाली. नऊ मे रोजी केवळ सहा लाख 89 हजार 652 डोस देण्यात आले. ही संख्या पाच एप्रिलच्या तुलनेत तब्बल 84 टक्क्यांनी कमी होती. त्यामुळे एक मेपासून सुरू झालेल्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणापुढे सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एप्रिल महिन्यात 45 वार्षपुढील 34.5 कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, एप्रिल महिन्यात लसीकरणाचा गाठलेला उच्चांक पुन्हा गाठला गेलाच नाही. प्रत्यक्षात त्यानंतर कधीही लसीकरणाची संख्या समाधानकारक झालीच नाही. प्रत्येक राज्य लसीचा तुटवडा असल्याची तक्रार करत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे.
दुसऱ्या लाटेचा तडाखा पाहता भारताने लसीकरण मोहीम वेगाने वाढवण्याची गरज आहे त्यासाठी यापूर्वी एका दिवसांत पार केलेल्या 43 लाख जणांच्या लसीकरणाचा विक्रम नव्याने मोडण्याची गरज निर्माण झाली आहे. भारत दोन डोस असणारी लस वापरत आहे. भारतात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 94 कोटीच्या घरात आहे. त्यामुळे लसीचे 188 कोटी डोस लागणार आहेत. या 94 कोटी जनतेपैकी केवळ 3 कोटी 57 लाख जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लस दिलेल्यांमध्ये 13 कोटी 44 लाख जणांनी तर लसीचा केवळ पहिलाच डोस घेतला आहे.
आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार, करोनाची तिसरी लाट भारतावर ऑक्टोबरमध्ये आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज शास्त्रज्ञ आणि डॉक्टर व्यक्त करत आहेत.
गणित काय मांडते?
या आव्हानांचा विचार करताना गणितीय आधार घ्यावा लागेल. हे लसीकरणाचे आव्हान ऑक्टोबरपूर्वी पार करण्यासाठी आपल्याला 17.5 कोटी जणांचे लसीकरण प्रतिमहिना करावे लागेल. त्यासाठी महिन्याला 35 कोटी डोस लागतील. तरच आपण लक्ष्य गाठू शकू. आपल्या लोकसंख्येच्या 70 टक्के जणांना लस दिल्यास सामूहिक प्रतिकारशक्ती येईल, असे ठरवल्यास 60 कोटी जनतेला पाच महिन्यात लस द्यावी लागेल, त्यासाठी 24 कोटी डोस प्रतिमहिना लागतील.
मात्र, गेल्या महिन्यातील म्हणजे एप्रिलमधील आकडेवारी पाहताही हे आव्हान अशक्यप्राय असल्याचे दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसांत केवळ 1.52 कोटी जणांना हे प्रमाण 16 लाख 87 हजार प्रतिदिन आहे. तर लसीकरणाचा हाच वेग मे महिन्यात प्रतिदिन 30 लाख होता.
एप्रिल महिन्यात 45 वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यावेळी एक ते नऊ एप्रिल या कालावधीत तीन कोटी 29 लाख 57 हजार 264 जनांचे लसीकरण करण्यात आले. त्यातुलनेत आपला लक्ष्य असणारा लसीकरणाचा वयोगट पाहता आपण मे महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसांत केवळ एक कोटी 51 लाख 86 हजार 968 डोस दिले. ही वाढ केवळ 9.80 टक्के एवढीच आहे, त्यामुळे ऑक्टोबरपूर्वी हे लक्ष्य गाठणे जवळपास अशक्य असल्याचे आढळत आहे.





