ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन 1 लाख 30 हजार कोटींवर

नवी दिल्ली – गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातील जीएसटी कलेक्शन आता 1 लाख 30 हजार कोटींवर गेले आहे. गेले लागोपाठ चार महिने हे कलेक्शन 1 लाख कोटींवर गेले आहे. तथापि, 1 लाख 30 हजार कोटींवर गेलेले कलेक्शन हे ही योजना सुरू झाल्यापासूनचे सेकंड हायेस्ट कलेक्शन मानले जाते.
माल विक्री आणि सेवांचा पुरवठा याच्या प्रमाणात ऑक्टोबर महिन्यात तब्बल 24 टक्के वाढ झाली आहे. त्यातून हा महसूल वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 1 लाख 30 हजार 127 कोटी रुपये कलेक्शन झाले आहे.
त्यात सीजीएसटीचे कलेक्शन 23 हजार 861 कोटी, एसजीएसटी कलेक्शन 30 हजार 421 कोटी, आणि आयजीएसटी कलेक्शन 67 हजार 361 कोटी इतके आहे. सेसच्या रूपाने सरकारकडे 8 हजार 464 कोटी रुपये जमले आहेत. इकॉनॉमिक रिकव्हरीशी सुसंगत असेच हे कलेक्शन आहे.
जीएसटी लागू झाल्यानंतर वर्षभरातील हा दुसरा उच्चांक आहे. या वर्षी एप्रिलमध्ये 1.4 लाख कोटी रुपये जीएसटीच्या रुपात जमा झाले होते. यापूर्वी सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 1,17,010 कोटी रुपये होते. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन 1,12,020 कोटी रुपये आणि जुलैमध्ये 1.16 लाख कोटी रुपये होते.
जूनमध्ये, जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी म्हणजेच 92,8849 कोटी रुपये होते. मे महिन्यात ते 98,000 कोटी रुपये होते. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.41 लाख कोटी रुपये होते.
दरम्यान, कंपन्यांनी उत्पादनात वाढ केल्याने आणि कच्च्या मालाची खरेदी वाढल्याने, मागणी वाढल्याने ऑक्टोबरमध्ये भारतातील उत्पादन प्रक्रिया आणखी वाढली आहे. सोमवारी झालेल्या मासिक पाहणीत ही माहिती देण्यात आली. उत्पादन आणि नवीन मागण्या ऑक्टोबरमध्ये सात महिन्यांत सर्वात वेगाने वाढल्या, सर्वेक्षणात म्हटले आहे.





