Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीला अटक; सिया-चेतनच्या अटकेनंतर मोठा ट्विस्ट
Ketan Agrawal Case : आरोपीला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आता त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
या हत्याकांडात झालेली ही तिसरी अटक असून, कट माहीत असूनही पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने रितेश हांडे याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या हत्याकांडात सिया आणि चेतन हे मुख्य सूत्रधार असल्याचं तपासातून समोर आलं असून, चेतनने हत्येपूर्वी आणि हत्येनंतर रितेशला या प्रकरणाची माहिती दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तपासादरम्यान जबाब आणि तांत्रिक पुराव्यांमध्ये रितेशचं नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
डिलिट केलेले चॅट्स रिकव्हर होताच बिंग फुटलं
समोर आलेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने रचलेल्या संपूर्ण कटाची कल्पना रितेशला आधीपासूनच होती. गुन्हा घडल्यानंतरही तो आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. स्वतःचा सहभाग लपवण्यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलिट केले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे चॅट्स रिकव्हर करताच त्याचे बिंग फुटले.
बीड कनेक्शन समोर
अटक करण्यात आलेला रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तिघेही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती. दरम्यान, आता या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.
हेही वाचा:






