पुणे जिल्हा | तृतीयपंथीयांचा सुळसुळाट, वाहनचालक त्रस्त

लोणी काळभोर (वार्ताहर)- पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीय पंथीयांच्या सिग्नलवर पैसे मागण्यांसंदर्भात कडक निर्बंध घातले असले तरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे तृतीय पंथीयांवर अजूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे कवडीपाट टोलनाक्यावर पैसे मागण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता. 10) आदेश काढून तृतीयपंथीयांसाठी कडक निर्बंध घातले आहेत. शहरात यापुढे तृतीयपंथीयांना सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत. तसेच घरगुती समारंभामध्ये देखील आमंत्रणाशिवाय हजेरी लावता येणार नाही. तृतीयपंथींयांनी या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागण्यासाठी वाहनचालकांकडे जातात. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास जबरदस्ती केली जाते. हा प्रकार पुणे शहरासह जिल्ह्यातही सर्रासपणे पाहिला मिळतो. त्यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथीयांना सिग्नलवर पैसे मागण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट टोलनाका येथे रस्त्यावर थांबून वाहनचालकांशी हुज्जत घालून तृतीयपंथी पैसे उकळत आहेत.
कवडीपाट येथील बंद झालेल्या जुन्या टोलनाक्याजवळ गतिरोधक असल्याने त्याठिकाणी चारचाकी वाहने हळू होत असतात. वाहने हळू झाल्याने तृतीयपंथी गाडीच्या काचेवर हाताने जोरजोरात मारतात व दमदाटी करुन पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास वाहनचालकांना शिवीगाळ व कथित शापाची लाखोली वाहिली जात असल्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे.
’साईड बिझनेस’ची व्याप्ती वाढली
लोणी काळभोर येथील माळी मळा हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर, तृतीयपंथी सायंकाळी सात वाजल्यानंतर खुलेआमपणाने रस्त्याच्या बाजूला ’साईड बिझनेस’ करत आहेत. त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी चालकांना हात दाखवून नाना प्रकारचे इशारे केले जात आहेत. त्यामुळे या ’साईड बिझनेस’ची व्याप्ती लोणी काळभोर परिसरात वाढू लागली आहे.
काही भामट्यांचा समावेश
पुणे शहरासह ग्रामीण भागात तृतीयपंथीयांची मोठी वस्ती आहे. त्यामुळे येथे काही भामटे तृतीयपंथीयांची वेशभूषा परिधान करून आपला गोरखधंदा करत आहेत. परिणामी, खरे आणि खोटे तृतीयपंथी असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बिना मेहनतीचा अमाप पैसा येत असल्याने टाळी वाजवून पैसे मागणार्यांमध्ये आता बनावट तृतीयपंथीयांच्या टोळ्यांचा शिरकाव वाढला आहे





