गणेश घाडगे
तालुक्यात घुले, तुकाराम गडाख यांच्या कार्यकर्त्यांसह विविध गावांत बैठका सुरू
नेवासा – नेवासा तालुक्यात सध्या आजी-माजी लोकप्रतिनिधींबाबत कार्यकर्त्यांतूनच नाराजीचा सूर निघत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या शक्तीला बळकटी देण्यासाठी तालुक्यात पडद्याआड हालचाल सुरू झाल्या आहेत. या आघाडीसाठी कोणाचे नेतृत्व पुढे येते व ज्ञानेश्वरची साथ कोणाला मिळते, यावर या आघाडीचे यशापयश अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. त्यातच तिसऱ्यासाठी मात्र घुले बंधूंचीच साखर पेरणी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात रंगू लागली आहे.
तालुक्याचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. भाजपसमोर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह नाराज कार्यकर्त्यांच्या व घुले बंधूंच्या तिसऱ्या उमेदवाराचे आव्हान असणार असल्याने आगामी निवडणुका रंगतदार ठरणार आहे. या तालुक्याने एकाच लोकप्रतिनिधीला अजूनपर्यंत दुसऱ्यांदा स्वीकारले नाही.
साखर कारखानदार व मातब्बरांना या तालुक्याने नेहमीच पराजयाची धूळ चारून सर्व सामन्यांना विजयी केले आहे. तसेच त्यांना देखील खाली खेचल्याचा इतिहास अनेकजण बोलून दाखवतात.
2014 पासून तालुक्यात अनपेक्षित बदल झाल्याने पराभव जिव्हारी लागलेले माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना वेळोवेळी खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. गडाखांनी ठराविक कार्यकर्ते सोडून सर्वसामन्य कार्यकर्तेच्या जवळ गेलेच नाहीत. सर्वसामन्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अडचणी येऊन संपर्क होऊ शकला नाही. याचीच खदखद आजही अनेक कार्यकर्त्यांना ना सलत आहे.
विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना मदत करणाऱ्यांनाच आमदार मुरकुटेंकडून वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपी कार्यकर्त्यांकडून होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवल्याने अनेकांना आर्थिक तोट्यासह पराभव पत्करावा लागला, तर अनेकांची उमेदवारी डावलण्यात आल्याचा आरोप देखील आमदार मुरकुटेंवर होत आहेत.
आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार तुकाराम गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे काही खास कार्यकर्ते सध्या तालुक्यातील या आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांसह निवडणूक तयारीसाठी लागले असून, त्यांच्या तालुक्यात बैठका पार पडत आहेत. माजी खासदार तुकाराम गडाख यांनी देखील तालुक्यात संपर्क वाढवून निवडणूक तयारीला लागल्याचे संकेत दिले असले, तरी त्यांचे जुने सहकारी त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यामुळे आमदार शिवाजीराव कर्डिले व माजी खासदार तुकाराम गडाख यांचा कार्यकर्त्यांचा मोठा गट सध्या नवख्या कार्यकर्त्यांसह बैठका घेत असल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आपली सर्व ताकद आमदार मुरकुटे यांच्या पारड्यात टाकल्याने आपला पराभव झाल्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडत अनेक कार्यक्रमांच्या प्रसंगी उघड केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील माजी आमदार घुले ज्या पारड्यात झुकतील तेच पारडे पुढ जाऊ शकते, असे देखील चर्चिले जात आहे. माजी आमदार घुले यांचे देखील काही कार्यकर्ते तसऱ्या उमेदवाराच्या बैठकीत आवर्जून उपस्थित राहात असून, पुढील दिशा ठरवत असल्याचे बोलले जात आहे. तसेच नेवासा तालुक्याचे आमदार गडाख नकोत, अशी स्पष्ट भूमिका घुले आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना बोलून दाखवत असल्याने 2019 ची विधानसभा निवडणूक मात्र वेगळीच होणार, अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगू लागली आहे.