Personal Loan : वैयक्तिक कर्ज काढून व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे? त्याआधी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Personal Loan For Business: व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. अनेकजणांकडे भांडवलच नसल्याने व्यवसाय सुरू करण्यात अडथळा येतो. अशावेळी व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज हा एकमेव पर्याय समोर असतो. मात्र, वैयक्तिक कर्ज काढताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. तुम्ही देखील वैयक्तिक कर्ज काढून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
व्याजदराकडे द्या लक्ष
वैयक्तिक कर्ज हे खूपच पैशांची गरज असल्यावरच काढायला हवे. मात्र, बहुतांशजण सर्रासपणे अशाप्रकारचे कर्ज काढण्याला प्राधान्य देतात. वैयक्तिक कर्जासाठी कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागत नसल्याने याचे व्याजदर जास्त असते. बँकांचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे 9 ते 15 टक्क्यांपर्यंत आहे.
तुम्ही जर बँके व्यतिरिक्त इतरांकडून कर्ज घेतल्यास व्याजदराचा आकडा अजूनच वाढतो. यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे खूपच गरज असल्यावरच अशाप्रकारच्या कर्जाची निवड करावी. तुमचा जर लघू अथवा कुटीर उद्योग सुरू करण्याचा विचार असल्यास वैयक्तिक कर्ज काढू शकता. मात्र अशा कर्जाची रक्कम ही 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतच असावी.
उत्पन्न व परतफेड
तुमचे उत्पन्न व कर्जाची परतफेड यामध्ये जवळचा संबंध आहे. तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज तर काढाल, मात्र उत्पन्नच नसल्यास त्याची परतफेड करणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडू शकता. त्यामुळे कधीही तुमचे उत्पन्न, परतफेड करण्याची क्षमता यानुसार वैयक्तिक कर्ज काढावे.
बहुतांशवेळा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यातून त्वरित उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कशाप्रकारे कर्जाचे हफ्ते फेडू शकता, याचाही विचार करायला हवा.
कागदपत्रे
वैयक्तिक कर्ज काढताना सर्वसाधारणपणे वस्तू गहाण ठेवण्याची गरज नसते. मात्र, यावेळी तुम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा अशी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत.
कर्ज काढताना तुमचा क्रेडिट स्कोर देखील तपासला जातो. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज काढताना फारशी अडचण येत नाही.
व्यवसायासाठी वैयक्तिक कर्ज काढणे योग्य?
कधीही वैयक्तिक कर्ज हा शेवटचा पर्याय असावा. व्यवसाय सुरू करत असाल अथवा व्यवसायात अचानक समस्या आल्यास तुम्ही कर्ज काढू शकता. मात्र, अशा कर्जाची रक्कम कमी असावी व त्याची लवकरात लवकर परतफेड देखील करायला हवी. अन्यथा तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.





