ओटीटीवरील गोष्टींचेही स्क्रीनिंग गरजेचे; पॉर्नोग्राफीबाबत न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली – ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचेही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. त्यानंतर न्यायालय पुढील सुनावणी शुक्रवारी करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात ऍमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी सुरू आहे. ऍमेझॉन प्राईमवरील “तांडव’ या वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अन्य कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर आज न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचीही स्क्रीनिंग झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अपर्णा पुरोहित यांच्याकडून बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला, ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातील नियम नुकतेच जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणामधील अर्जदार या केवळ ऍमेझॉनच्या एक कर्मचारी आहेत. ज्यांनी ही सीरियल बनवली आहे त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला पाहिजे. आमच्याविरोधात 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी भूमिका मांडली.





