पुणे जिल्हा | पूर गावात चोरीचे सत्र

पूर, (वार्ताहर)- रोहित्र चोरी,वीजेच्या तारांची चोरी वीज पंप चोरी सत्र उन्हाळा आला की सुरू होते. मात्र यातील गुन्हेगारांचा तपास लागल्याचे फारसे ऐकिवात नाही. यावेळी प्रश्न पडतो की चोरांना मदत करणारे नेमके कोण ? यामध्ये शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसतो.
पूर येथे तीन डीपी बसवण्यासाठी विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. हे काम एसटी इलेक्ट्रिकल भोसरी पुणे कंपनीने घेतले असून 15 दिवसांपूर्वी या वाहिनीचे काम केले असून दोन ते तीन दिवसांपूर्वी अपरात्री चोरट्यांनी डाव साधत अर्धा किमी अंतराची 1 लाख रुपयांची तीन पदरी अॅल्युमिनियम तारांची चोरी करण्यात आली. याअगोदरही 11 खांब व विद्युत वाहिनी तारांची चोरी दिवसाढवळ्या करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीने महावितरण व पोलीस ठाण्याला कळविले होते.मात्र तरीही अशा घटना घडतात मग यांना सहकार्य करणारे नेमके कोण, असा प्रश्न पूर ग्रामस्थांना पडला आहे. एवढेच नव्हे तर तंटामुक्ती अध्यक्ष, व इतर तीन ग्रामस्थांची विहिरीवरील 5 एचपीचे वीजपंप काढून नेले आहेत.
तर पूर ग्रामपंचायतीने ने तयार केलेल्या स्वर्ग रथाचे मागील पूर्ण चाकच काढून नेले त्यामुळे ग्रामस्थांनी कमालीची संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.या चोरीचा पंचनामा पोलिसांनी केला असून गुन्हेगारांचा तपास केला जाईल असे सांगितले.
हे चोरटे याच परिसरातील माहितगार असून त्याचा शोध घेऊन गुन्हेगाराला शिक्षा करावी अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशन समोर येऊन बसणार आहेत. – लताताई गावडे, सरपंच, पूर



