पुणे | दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीन दानपेटी फोडण्याचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्याने पंधरा दिवसांपूर्वी फर्गसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे उघडकीस आले होते.
साहिल अशोक माने (१९, रा. इंदिरा गांधी वसाहत, औंध रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याचे आणखी दोन साथीदार फरार आहेत.
नारायण पेठेतील प्रगतीशील मित्रमंडळ गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी ११ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता.
पोलीस अंमलदार नीलेश साबळे आणि दत्ता सोनवणे यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. त्यामध्ये हे चोरटे आढळून आले होते.
वाहन क्रमांकाच्या पाटीवरून पोलिसांनी तपास सुरू करून ओैंध परिसरात अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साहिल माने याच्या मदतीने फर्गसन रस्त्यावरील संत तुकाराम पादुका मंदिर, शनिवार पेठ सार्वजनिक नवरात्रोैत्सव ट्रस्ट,
तसेच प्रगतीशील मंडळाच्या मंदिरातील दानपेटी फोडल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अंमलदार दत्ता सोनवणे, नीलेश साबळे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, अण्णा माने, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, विठ्ठल साळुंके, रुक्साना नदाफ यांनी ही कारवाई केली.
-नशा, पार्टी आणि कपडे –
साहिलवर डेक्कन, चतुश्रृंगी येथे प्रत्येकी एक, तर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन असे चार गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी वस्ती परिसरात राहणारे आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते मंदिरातील दानपेट्या चोरून त्यातून नशा, पार्टी आणि कपड्यांची खरेदी करायचे.
दानपेटीत नक्की किती पैसे
दानपेटीतील पैशांची महिनोंमहिने मोजणी होत नाही. यामुळे मंदिर प्रशासनाने तक्रार देताना अंदाचे दहा ते अकरा हजार रुपये चोरल्याची तक्रार दिली. मात्र, प्रत्यक्षात दोन दानपेट्यांमध्ये २१ ते २५ हजार एवढी रक्कम होती.





