चोरीतून ‘चांगभल’: चोरट्याने देवाला अर्पण केलं चोरीचं सोनं!

पुणे – पुण्यातील एका घरफोडीत चोरट्याने अनपेक्षित पावलं उचलत चोरी केलेल्या सोन्यापैकी चार तोळे सोनं कोल्हापूरच्या एका देवस्थानाला अर्पण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित चोरट्याला अटक करण्यात आली असून, उर्वरित चोरीचा सारा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र देवस्थानाला अर्पण केलेलं सोनं परत मिळवण्यासाठी आता पोलीस प्रयत्न करत आहेत.
आरोपीचं नाव रोहित विलास अंधारे (२५) असून तो मूळचा धाराशिवचा असून सध्या खराडी येथील थिटे वस्तीत राहत होता. तो व्यवसायाने एक्स-रे टेक्निशियन आहे, परंतु अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे त्याच्यावर सुमारे ८-९ लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने घरफोडीचा मार्ग निवडला.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनूसार हडपसर पोलीस ठाण्यात १८ मे रोजी घरफोडीची तक्रार दाखल झाली होती. गुन्ह्यात नंबर प्लेट नसलेली यामाहा दुचाकी वापरण्यात आली होती. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना घरफोडी करणाऱ्या आरोपीने ही दुचाकी वापरली असल्याचे निष्पन्न झाले.
सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे आणि सी.बी. बेरड यांच्या पथकांनी सलग २३ दिवस तपास १७० सीसीटीव्ही तपासून आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला. अखेर मांजरीतील गोडबोले वस्तीजवळ सापळा रचून अंधारेला अटक करण्यात आली.आरोपीकडून ४८ तोळे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी आणि एक दुचाकी असा एकूण ४३.५५ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीने पुणे व नाशिक येथील ठिकाणी चोरीचा ऐवज लपवून ठेवला होता. पोलिसांनी त्याचे ठिकाणे शोधून ती मालमत्ता जप्त केली आहे.
‘ती’ दुचाकी आणि तिच्यामागची गोष्ट
गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही मुंढवा येथील एका कुटुंबाची होती, ज्यांनी चार वर्षांपूर्वी शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीनंतर सामूहिक आत्महत्या केली होती. ती दुचाकी पार्किंगमध्येच पडून होती. आरोपीचा मामेभाऊ त्या सोसायटीत राहत असल्यामुळे त्याला ही दुचाकी मिळाली. माहिती असूनही आरोपीने ती दुरुस्त करून गुन्ह्यांत वापरली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, संदीपान पवार आणि पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, अजित शिंदे, गणेश ढगे, इरफान पठाण, रविंद्र लोखंडे, महेश पाटील, साईकुमार कारके, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, जहांगिर पठाण, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले, गणेश लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश गोसावी, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, गणेश खरात, दयानंद तेलंगे, नारायण बनकर, सुरेश जाधव यांनी केली आहे.





