Space Food: अंतराळात नेण्यासाठी ‘या’ तीन भारतीय पदार्थांचीच झाली निवड; कारणही खास
Space Food अंतराळात अन्न पाठवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पाळावे लागतात. ते अन्न अनेक महिने खराब होता कामा नये. त्यामध्ये कोणतेही हानिकारक जीवाणू नसावेत. त्यात संतुलित पोषणमूल्ये आणि कमी प्रमाणात सोडियम असणे आवश्यक असते.

Space Food: अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांचे जीवन आणि त्यांचा आहार याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. शून्य गुरुत्वाकर्षणात ते काय खातात, अन्न कसे साठवले जाते आणि कोणते पदार्थ अंतराळात नेले जाऊ शकतात, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. अंतराळात कोणतेही अन्न पाठवण्यापूर्वी त्याची अत्यंत कठोर चाचणी केली जाते. ते अन्न दीर्घकाळ खराब होता कामा नये, पोषणमूल्यांनी समृद्ध असावे, जीवाणूमुक्त असावे आणि शून्य गुरुत्वाकर्षणात सहज खाता येईल, अशा अनेक निकषांवर ते तपासले जाते.
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या ऐतिहासिक Axiom-4 मोहिमेसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) अंतर्गत असलेल्या डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) ने अनेक भारतीय पदार्थ तयार केले होते. यामध्ये खिचडी, पुलाव, विविध भाज्या आणि इतर पदार्थांचा समावेश होता. मात्र, सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर केवळ तीन भारतीय पदार्थांनाच अंतराळात नेण्यास अंतिम मंजुरी मिळाली.
यामध्ये सर्वप्रथम नाव येते गाजराच्या हलव्याचे. हिवाळ्यात घराघरांत आवडीने बनवला जाणारा हा गोड पदार्थ विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला होता. त्यामुळे तो दीर्घकाळ सुरक्षित राहू शकला आणि अंतराळातील प्रवासातही त्याची चव व गुणवत्ता टिकून राहिली. अंतराळवीरांसाठी गोड पदार्थ म्हणून गाजराचा हलवा उत्तम पर्याय ठरला.
दुसरा पदार्थ होता मुगाच्या डाळीचा हलवा. हा पदार्थ प्रथिनांनी समृद्ध असून सहज पचणारा मानला जातो. त्यामुळे अंतराळ मोहिमेसाठी तो योग्य ठरला. शुभांशु शुक्ला यांनी सांगितले की, हा हलवा त्यांच्या सहकारी अंतराळवीरांना इतका आवडला की, त्यांच्यासाठी फारसा उरलाच नाही. यावरून भारतीय पारंपरिक मिठाईची चव जगभरातील लोकांना आवडू शकते, हेही दिसून आले.
तिसरा पदार्थ होता आमरस. उन्हाळ्यात अनेकांचा आवडता असलेला आमरसही विशेष प्रक्रियेनंतर अंतराळात नेण्यात आला. त्याची चव, गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकून राहावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता.
मात्र, अनेकांच्या आवडीचे खिचडी आणि पुलाव हे पदार्थ अंतराळात जाऊ शकले नाहीत. याचे कारण त्यांची गुणवत्ता नव्हती, तर त्यांची चाचणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे या पदार्थांना आवश्यक प्रमाणपत्र मिळू शकले नाही आणि त्यांना मोहिमेत समाविष्ट करता आले नाही.
अंतराळात अन्न पाठवण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पाळावे लागतात. ते अन्न अनेक महिने खराब होता कामा नये. त्यामध्ये कोणतेही हानिकारक जीवाणू नसावेत. त्यात संतुलित पोषणमूल्ये आणि कमी प्रमाणात सोडियम असणे आवश्यक असते. तसेच, त्याची पॅकेजिंग अशी असावी की शून्य गुरुत्वाकर्षणात अन्नाचे कण हवेत तरंगणार नाहीत. याशिवाय, आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थांकडून सुरक्षा मान्यता मिळाल्यानंतरच ते अन्न अंतराळ मोहिमेत वापरले जाते.
भारतीय खाद्यसंस्कृतीची चव आता पृथ्वीपुरती मर्यादित राहिलेली नाही. गाजराचा हलवा, मुगाच्या डाळीचा हलवा आणि आमरस या पारंपरिक भारतीय पदार्थांनी अंतराळातही आपला ठसा उमटवला आहे. भविष्यात आणखी अनेक भारतीय पदार्थ आवश्यक चाचण्या पूर्ण करून अंतराळवीरांच्या आहाराचा भाग बनतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





