पुढची 5 वर्ष सुद्धा या योजना चालणार; प्रफुल्ल पटेल यांचे विधान

गोंदिया : लाडकी बहीण योजना असो, गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय असो किंवा मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय असो, या आणि इतर अशा अनेक कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे. अजित पवार यांच्यासारखा संयमी अर्थमंत्री आपल्या राज्याला लाभला आहे. त्यांना पैसा कसा वाचवायचा याची माहिती आहे. त्यामुळे एकदा अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर त्याबाबत शंका उपस्थित करणे योग्य नाही.
पुढची पाच वर्ष सुद्धा या योजना चालणार आहेत. इतक नाही, तर या योजनांतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्यदेखील वाढणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर नाही, असे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदिया येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना राज ठाकरेंच्या टीकेबाबतही विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, ज्या लोकांना विधानसभेची आणि सरकारची माहिती नाही, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे बरोबर आहे का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी महायुतीच्या जागावाटपावरही भाष्य केले. महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झालेले आहे. येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये जागा वाटपाबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तिन्ही पक्ष मिळून याबाबत सकारात्मक आहेत. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार निवडून आले आहेत, त्यासंबंधी सुद्धा विचार करण्यात आला आहे. जिथे जागांची अदलाबदल आवश्यक आहे, तिथे ती करण्यात येईल. तसेच कोण किती जागा लढणार? हा निर्णय सुद्धा लवकर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.





