मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आता या स्पर्धेनंतर भारताने आपला मोर्चा वनडे वर्ल्डकप 2027 कडे वळवला आहे. वनडे वर्ल्डकपला 2 वर्षे बाकी आहेत मात्र टीम इंडियाला आतापासूनच संघबांधणीला सुरुवात करावी लागणार आहे. या वर्ल्डकपमध्ये संघाची धुरा कोण सांभाळणार? इथपासून तयारी करावी लागणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत ‘या’ 3 युवा खेळाडूंना मिळू शकते संधी या वर्ल्डकपमध्ये भारताच्या ३ युवा खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग असू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याचा संघात समावेश केला होता. पण शेवटच्या क्षणी त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. दुसरा खेळाडू म्हणजे मयंक यादव. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या वर्षी टी20 मालिकेतून पदार्पण केलं आहे. 150 च्या स्पीडने चेंडू टाकत असल्याने त्याच्यावर विशेष नजर असणार आहे. जर तो फिट अँड फाईन राहिला आणि फॉर्मही त्याचा असेल तर त्याची नक्कीच संघात निवड केली जाऊ शकते. मयंक यादव आपल्या वेगवान गोलंदाजीने आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहला साथ देऊ शकतो. तिसरा खेळाडू म्हणजे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्तीने टीम इंडियातून ड्रॉप झाल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं. वरुण चक्रवर्ती खऱ्या अर्थाने मिस्ट्री गोलंदाज ठरला. भारतासाठी डोकेदुखी ठरलेला ट्रेव्हिस हेडचाही काटा काढला. या स्पर्धेतील 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. तसेच न्यूझीलंडविरुद्ध साखळी फेरीच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या.