‘राज्यात आर्थिक अराजकता निर्माण होईल..’; जयंत पाटलांचे राज्य सरकारवर टिकास्त्र

मुंबई – राज्य सरकारने ६ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. धक्कादायक बाब म्हणजे, सत्ताधारी पक्षाने सभागृहात जाणीवपूर्वक गोंधळ घालून ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर केल्या. यामुळे राज्यात आर्थिक अराजकता निर्माण होईल, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले.
जयंत पाटील म्हणाले, ९४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब केले. महाराष्ट्राच्या माथ्यावर ९४ हजार कोटी रुपयांचा नवा भुर्दंड मारण्यात आला आहे. या पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा महाराष्ट्र सरकारने केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आजच्या पुरवणी मागण्या अवैध मार्गाने मान्य केलेल्या आहेत. ६ लाख ७० हजार कोटींचे एक बजेट मांडून, दुसऱ्या मिनिटाला ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. ही महाराष्ट्रात आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती आहे, अशी टीकाही त्यांनी केली. विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने आरक्षणासंदर्भातील बैठका घेणे अपेक्षित होते.
तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. सरकारने मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे 206 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचे काही कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगाविला.





