मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बॉलिवुडमध्ये सत्य घटनांवर आधारित अनेक दर्जेदार चित्रपट आल्याचे पाहायला मिळाले. यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दरम्यान, या वर्षी आता अशाच एका सत्य घटनेवर आधारलेला एक मोठा चित्रपट येणार आहे. या घटनेनं भारताचं एका प्रकारे भविष्यच बदललं होतं. हीच घटना आता रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
‘शाहबानो केस’वर चित्रपट येणार
देशभरात गाजलेल्या ‘शाहबानो केस’ वर आता चित्रपट येणार आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामी गौतमने याआधी आर्टिकल 370, काबील, बाला, उरी, OMG 2 या चित्रपटातही काम केलेले आहे. त्यानंतर आता ती या चित्रपटात शाहबानोची भूमिका साकारणार आहे. तिने या चित्रपटासाठी तयारी चालू केली आहे.
शाहबानो खटल्यावर आधारलेला हा चित्रपट जंगली पिक्चर्सतर्फे निर्माण केला जाणार आहे. विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा करणार आहोत. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे नेमकी शाहबानो केस?
भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात शाहबानो हा खटला चांगलाच प्रसिद्ध आहे. या खटल्यातील निकालानंतर भारतीय समाजकारण, राजकारणाची दिशा बदलली होती. हा खटला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो असा होता.
मोहम्मद अहमद खान हे शाहबानो यांचे पती होते. त्यांनी तीन तलाकच्या माध्यमातून शाहबानो यांना तलाक दिला होता. त्यानंतर शाहबानो यांनी पोटगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मोहम्मद खान यांनी पोटगी देण्यास नकार दिला होता. मी मुस्लीम पर्सनल लॉच्या मदतीने हा तलाक दिलेला आहे, त्यामुळे मी पोटगी देण्यास बांधील नाही, असे मत त्यांनी मांडले होते.
महिलेला पोटगी फक्त इद्दतच्या वेळीच दिली जाते, असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा खटला साधारण सात वर्षे चालला. एप्रिल 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो यांच्या बाजूने निकाल देत हा खटला मार्गी लावला होता. या निकालानंतर भारतीय समाजकारण, राजकारणाची दिशा बदलली होती.