डील करण्याशिवाय पर्याय नव्हता; कंदाहार प्रकरणावर रॉ चे तत्कालीन प्रमुख दुलत यांचा दावा

नवी दिल्ली : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या आयसी ८१४ : द कंदाहार हायजॅक या वेबसीरीजमुळे २५ वर्षापूर्वीची विमान अपहरणाची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूवरुन दिल्लीला येण्यासाठी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केले. पण हवेत असतानाच हे विमान हायजॅक करण्यात आले होते. या वेबसीरीजमुळे अनेक मुद्यांवर पुन्हा एकदा वादविवाद सुरु झाला आहे. तत्कालीन सरकारने ती परिस्थिती कशी हाताळली? वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा त्यात सहभाग असे अनेक मुद्दे आहेत. १९९९ साली आयसी ८१४ विमानाचे अपहरण झाले. त्यावेळी एएस दुलत रॉ चे प्रमुख होते. रॉ म्हणजे रिसर्च अँड एनालिसिस विंग. रॉ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची जबाबदारी असते.
परकीय शत्रूपासून देशाच संरक्षण करणे, त्यांच्या कारस्थानांची माहिती मिळवणे, ही रॉ ची जबाबदारी आहे. एएस दुलत विमान अपहरणाच्या विषयावर बोलले आहेत. निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळी सगळी गडबड झाली असे माजी रॉ प्रमुख एएस दुलत यांनी मान्य केले आहे. अमृतसरमध्ये विमान उतरल्यानंतर ते भारताच्या हद्दीबाहेर जाणार नाही हे सुनिश्चित करण्याची आम्हाला संधी मिळाली होती. पण विमान अमृतरसरमधून उडाल्यानंतर डील करण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. चर्चेतून जे उत्तम करणे शक्य होते, ते आम्ही केले, असे दुलत म्हणाले.
मी सुद्धा जबाबदार
कुठलाही निर्णय घेतला नाही. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा मी यावर अनेकवेळा बोललो. अमृतसरमध्ये गडबड, गोंधळाची स्थिती होती, असे दुलत म्हणाले. अपहरण झालेले आयसी ८१४ अमृतसरमध्ये इंधन भरण्यासाठी उतरलेले. ५० मिनिट हे विमान भारतीय भूमीवर होते. केंद्रीय सुरक्षा एजन्सी आणि पंजाब पोलिसांना या स्थितीचा फायदा उचलता आला नाही. आम्ही सर्व तिथे होतो. निर्णय घ्यायला पाहिजे होता. मला कोणाच नाव घ्यायच नाही. इतक्या वर्षांनी ते योग्य ठरणार नाही. दुसऱ्या कुणाइतका मी सुद्धा जबाबदार आहे. असे दुलत म्हणाले.





