औद्योगिक उत्पादनात झाली किरकोळ वाढ

नवी दिल्ली – कच्च्या मालाचे वाढल्यामुळे आणि मागणी कमी असल्यामुळे औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम कायम आहे. सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन केवळ 3.1 टक्क्यांने वाढले आहे. समाधानाची बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यात औद्योगिक उत्पादन उणे 0.1% होते. म्हणजे मासिक पातळीवर औद्योगिक उत्पादनात बर्यापैकी वाढ झाली आहे.
मात्र गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन 6.4% होते. त्या तुलनेत यावर्षी औद्योगिक उत्पादन कमी पातळीवर आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादन कमी झाल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम औद्योगिक उत्पादनावर होणे अपेक्षित होते. सप्टेंबर महिन्यामध्ये खाण, मॅन्युफॅक्चरिंग आणि वीज निर्मिती वाढल्यामुळे औद्योगिक उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र सध्या होत असलेली औद्योगिक उत्पादनाची वाढ सात टक्के विकासदारासाठी पुरेशी नाही.
त्यामुळे पुढील महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्याची गरज आहे. मात्र जास्त व्याजदर आणि मागणीचा अभाव या कारणामुळे औद्योगिक उत्पादनात अपेक्षित वाढ होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन केवळ चार टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत औद्योगिक उत्पादन 6.2% वाढले होते. विकासदर 7% होण्यासाठी औद्योगिक उत्पादनात त्या प्रमाणात वाढ होण्याची गरज विश्लेषकानी व्यक्त केली. एकूण परिस्थिती पाहता यावर्षी रिझर्व बँकेने ठरविल्याप्रमाणे भारताचा विकासदर 7.2% होईल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.





