‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजप कार्यालय उडवण्याचा होता कट’; एनआयएने केला धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली – बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. स्फोटामागे इसिसच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे एनआयएने म्हटले आहे. मुसाविर हुसेन शाजीब, अब्दुल मथिन अहमद ताहा, माज मुनीर अहमद आणि मुजम्मिल शरिफ या चौघांना आरोपी करण्यात आले आहे.
आरोपपत्रात म्हटले आहे की त्या दिवशी कॅफेमध्ये शाजिबने बॉम्ब ठेवले होते. त्यासाठी अहमद ताहा यानेही त्याला मदत केली होती. या अगोदर हे दोघे इसिस या दहशतवादी संघटनेशी जोडले गेले होते. इसिसच्या विचारधारेच्या प्रसाराचे ते काम करतात. अन्य मुस्लिम युवकांनाही या संघटनेशी जोडून घेण्याची त्यांची योजना होती. उर्वरीत दोन अरोपी माज मुनीर अहमद आणि मुजम्मिल शरिफ असेच त्यांच्या दिशाभूलीला बळी पडले.
रामेश्वरम कॅफेत स्फोट घडवण्यापूर्वी इतरही अनेक हल्ले करण्याची योजना त्यांनी केली होती. मात्र त्यांना त्यात यश मिळू शकले नाही. त्यांच्या या योजनांत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये स्फोट घडवून आणण्याचाही समावेश होता. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. त्याच दिवशी हे स्फोट घडवण्याचे दहशतवाद्यांचे नियोजन होते.
शाजिब आणि ताहा यांना त्यांच्या हँडलरकडून क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैसे दिले गेले होते. याच पैशाचा उपयोग त्यांनी बंगळुरूत हिंसाचार करण्यासाठी केला होता. मल्लेश्वरम येथील भाजप कार्यालयात स्फोट घडवण्याची त्यांची योजना होती, ती अयशस्वी ठरली. त्यानंतर दोन्ही मुख्य आरोपींनी रामेश्वरम कॅफेची योजना बनवली.
रामेश्वरम कॅफेत स्फोट झाल्यानंतर दोन्ही मुख्य आरोपींना ४२ दिवसांनी. प. बंगालमध्ये अटक करण्यात आली होती. ते मुळचे कर्नाटकातील शिवमोगा येथील रहिवासी आहेत मात्र बंगालमध्ये लपले होते. त्यांच्याकडे अनेक बोगस सिमकार्ड, बोगस दस्तावेज प्राप्त झाले आहेत. हे सगळे त्यांनी डार्क वेबवरून डाउनलोड केले होते.





