शहरात आंतरराष्ट्रीय गोल्ड कनव्हेंशन सेंटर असावे

पिंपरी -आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पिंपरी चिंचवड शहराचे नाव मोठे आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात सोन्याच्या व्यापारासाठी आंतरारष्ट्रीय कनव्हेंशन सेंटर असावे. शहरात एकच हॉलमार्किंग सेंटर आहे. त्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवड सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष व सराफा व्यावसायिक दिलीप सोनिगरा यांनी व्यक्त केली.
दै. प्रभातने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात दर्शन आणि आरतीसाठी दिलीप सोनिगरा आले होते. त्या वेळी डिजिटल प्रभात शी संवाद साधताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत करोनाच्या काळात व्यापार मंदावला होता. आता परिस्थिती परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या वर्षी व्यापारही 30 टक्के वाढला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास व्यापार, बाजारपेठ पूर्वपदावर येऊ शकतो. मध्यमवर्गीय नागरिक सोन्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहतात. मात्र, आता सरकारने 5 टक्के आयात शुल्क वाढविल्याने अंदाजे 2500 रुपयांचा भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. त्यावर उपाययोजना व्हावी.
दिलीप सोनिगरा म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांत मोठे, मोठे ब्रॅंड आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांची चांगली सुविधा झाली आहे. भाववाढीमुळे गुंतवणुकीकडे सध्या कमी वळत आहेत. त्यामुळे कमी वजनाचे तसेच ग्राहकांना परवडेल असे दागिने आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्यात एक ग्रॅम वजनाच्या मंगळसूत्राचाही समावेश आहे.
स्वत:चा ब्रॅंड सोनिगरा यांनी सांगितले की, चिंचवडमध्ये “मोहिनी’ ब्रॅंडचे हिरे, पोलकी आणि ऍन्टीक ज्वेलरीचे आम्ही शोमरूम सुरू केले आहे. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहिनी ब्रॅडची ज्वेलरी आम्ही स्वतः बनवतो. त्यात दरवेळी ग्राहकांनी नावीन्यपूर्ण दागिने देण्याचा प्रयत्न आहे. ग्राहकांचेही मते जाणून घेत आहोत.
चारशे व्यावसायिकांसाठी एकच हॉलमार्किंग सेंटर
दिलीप सोनिगरा म्हणाले की, पिंपरी चिंचवड सराफा व्यवसायाचे आंतरारष्ट्रीय बाजारपेठेत मोठे नाव आहे. शहरात सुमारे 400 व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी शहरात केवळ एकच हॉलमार्किंग सेंटर आहे. त्यात वाढ व्हावी. तसेच पिंपरी चिंचवड शहरात सोन्याच्या व्यापारासाठी आंतरारष्ट्रीय कनव्हेंशन सेंटरची गरज असून ते सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड सराफा व्यावसायिक सहकार्य करेल.





