Supreme Court : संसद, विधिमंडळात असभ्यतेला थारा नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

नवी दिल्ली : संसद आणि विधिमंडळ कामकाजात असभ्यता, आक्रमकतेला थारा नाही. सदस्यांनी एकमेकांबद्दल पूर्ण आदरभाव दाखवायला हवा, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने खासदार आणि आमदारांकडून सभागृहांत चांगल्या वर्तनाची अपेक्षा अधोरेखित केली. राजदचे नेते सुनीलकुमार सिंह यांची गैरवर्तनातबद्दल बिहार विधान परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली होती. मागील वर्षीच्या जुलैमध्ये ती कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने ती कारवाई रद्दबातल ठरवत सिंह यांना दिलासा दिला. सिंह यांच्यावरील कारवाईचे स्वरूप अतिशय कठोर असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्याचवेळी त्यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.
संबंधित निकाल देताना न्यायालयाने खासदार आणि आमदारांचे वर्तन सभागृहांमध्ये चांगले असण्याची गरज व्यक्त केली. सभागृहात बोलण्याच्या अधिकाराचा वापर इतर सदस्यांचा अवमान करण्याचे साधन म्हणून केला जाऊ नये. लोकशाही प्रक्रियांचे कामकाज प्रभावीपणे चालावे यासाठी सदस्यांनी एकमेकांबद्दल आदर दाखवायला हवा. त्यामुळे सभागृहातील चर्चा फलदायी ठरेल आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली जाईल. सभागृहाने सदस्यावर केलेली कारवाई योग्य प्रमाणात आणि न्याय्य असल्याची निश्चिती करण्यात न्यायालयांची भूमिका महत्वाची आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.





