स्मारकाला विरोध नाही, पण तांत्रिक बाबी तपासाव्या

सातारा -लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. पोवई नाक्यावर त्यांचे स्मारक होण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही. मात्र या परिसरात ग्रेड सेपरेटर आहे आणि या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येतात. त्या संदर्भाने जिल्हा महामार्ग व राज्य महामार्ग यांच्या तांत्रिक बाबी तपासून पहाव्या लागतील. पालकमंत्री शंभूराजे व आमचे जुने संबंध आहेत. ते यासंदर्भात चर्चेला येणार असतील तर स्वागतच असेल, अशी स्पष्ट भुमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
दरम्यान, शिवतीर्थ संदर्भात नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. या परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी जे जे करावे लागेल ते नक्की केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवतीर्थाच्या संदर्भातील भुमिका पत्रकारांसमोर मांडताना, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांनाही लक्ष्य केले. या वादाशी माझा संबंध नसताना, ज्यांची उंची नाही, बौद्धिक पात्रता नाही, ज्यांचा अनुभव कमी पडतो अशा लोकांच्या बडबडीकडे काय लक्ष द्यायचे अशी टीकाही त्यांनी केली. खासदार उदयनराजे पुढे म्हणाले, शिवतीर्थाच्या संदर्भात सध्या जी काही चर्चा सुरू आहे, त्याच्यावरून पालकमंत्री शंभूराज देसाई व माझ्यामध्ये वाद लावून देण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. ज्यांची उंची नाही, बौद्धिक पात्रता नाही, ज्यांचा अनुभव कमी आहे असे लोक मी स्वतःच्या विश्वात असल्याची टीका करत आहेत. पण, या बडबडीकडे मी लक्ष देत नाही, माझे विश्व लोकांचे आहे. त्यांचाच विचार मी करत असतो.
कमांड आणि डिमांड यांच्यातील फरक ज्यांना कळत नाहीत, त्यांच्याविषयी मी काय बोलायचे. आमच्याकडून लोकांची कामे होतात आणि आदर म्हणून लोक आम्हाला नमस्कार करतात. शंभूराज देसाई यांचे वडील शिवाजीराव देसाई व आमचे तीर्थरूप प्रतापसिंहराजे भोसले हे खास मित्र होते. शिवतीर्थाच्या संदर्भात शंभूराज आमच्याकडे चर्चेला येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. हे घर त्यांचेच आहे. राजकारण आणि समाजकारण यांच्यातील फरक ज्यांना कळत नाही त्यांनी या विषयावर अधिक न बोललेले उत्तम. शिवतीर्थ हा ऐतिहासिक परिसर असून या परिसरात पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत एक समिती नेमण्यात आली होती.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते 26 एप्रिल 1962 मध्ये या पुतळ्याचे अनावरण झाले. लढाईच्या आवेशातील छत्रपती शिवरायांचा तोफेवर हात ठेवून उभा असलेला पुतळा हा महाराष्ट्रातील एकमेव आहे. या संदर्भाने जे सध्या वाद सुरू आहेत, यामध्ये भावनिक इश्यू करण्यापेक्षा प्रत्यक्षात या कामाच्या संदर्भातील तांत्रिक बाबी तपासाव्या लागतील. लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे महान नेते होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या नावाचे स्मारक होण्यासाठी आमचा बिलकुल विरोध नाही. काहीजणांकडून तसे भासवले जात आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. पण ज्या ठिकाणी स्मारक उभे करण्याचा आग्रह केला जातोय त्याच्याखाली ग्रेड सेपरेटर आहे. तसेच या परिसरातील काही जागा जिल्हा परिषदेची आहे. काही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीची आहे. काही राज्य महामार्ग या परिसरातून जातात. रस्ते वाहतुकीचे निकष तत्पूर्वी तपासावे लागतील. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसा रीतसर प्रस्ताव केल्याचे समजले आहे. मात्र तो किती व्यवहार्य आहे हे आमच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर समजेलच. शिवतीर्थाचे पावित्र्य जपण्यासाठी जे जे करावे लागेल ते सर्व आम्ही करू असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.
सातारकरांच्या शिवतीर्थ संदर्भात तीव्र भावना असून लोकनेत्यांच्या स्मारकाला विरोध होत आहे. सरकार हे लोकांचे असते. लोकांसाठी असते. त्यांच्या जनभावना लक्षात घेतल्या नाही तर उद्रेक होण्याची भीती असते. ग्रेड सेपरेटरला लोड बेरिंग आहे. त्याला स्मारकाच्या बांधकामाचा बोजा सहन होणार का हेही तपासावे लागेल. राज्य महामार्ग 140 व 141 हे या परिसरातून जात असल्याने हे काम किती व्यवहार्यपणे होईल हे सुद्धा पहावे लागेल. शिवतीर्थ परिसराच्या जागेची मालकी सातारा जिल्हा परिषदेकडे आहे.
मात्र त्यांच्याकडून कोणतीही देखभाल केली जात नाही. प्रत्यक्षात सातारा नगरपालिका देखभाल करत आहे. नगरपालिकेकडेच ही जागा हस्तांतरित करावी अशी आम्ही वारंवार मागणी केली आहे. विकासकामाच्या कोणत्याही श्रेयवादामध्ये मी पडत नाही आणि इगो हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही. तरीपण इगोचे नाव घेऊन काहीजण माझ्यावर बोलतात, हे योग्य नाही. साताऱ्यातील सर्व शिवभक्तांचा छत्रपतींवर अधिकार आहे. कोणाला वाटत असेल काही कामे माझ्यामुळे झाली तर हरकत नाही. काम झाले पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. आमच्यात जुंपून देण्याची काम काही विकृत प्रवृत्ती करतात अशी टीका त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
माझा जिल्ह्यात कोणताही शत्रू नाही. राजकारणात वारंवार समीकरणे बदलत असतात. मी आजपर्यंत कधी फायदा तोटा पाहिलेला नाही. जीभ दिली म्हणून उचलायची आणि टाळ्याला लावायची. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, अशा शेलक्या शब्दात उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीका केली. शिवतीर्थ तसेच राहावे ही जनभावना आहे. स्टेट हायवेच्या निकषात काही गोष्टी बसणार असतील तर स्मारकाला विरोध होण्याचे काहीच कारण नाही. साताऱ्यात स्मारक होण्याकरता भरपूर जागा आहेत, असेही उदयनराजे यांनी निर्देशित केले.
सरकार आमचे आहे या शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले, हे जनतेचे सरकार आहे. सरकार हा जनतेच्या व्यवस्थेचा भाग असतो. मी सुद्धा व्यक्ती म्हणून सरकारचा एक भाग आहे. रयतेला डावलून तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, या मुद्द्याशी मी ठाम आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासंदर्भात त्यांनी काय प्रस्ताव केला आहे हे समोर येऊ द्या. मग त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे उदयनराजे यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवर नवा प्रस्ताव
सातारा शहराच्या वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी इंदिरानगर पारशी विहीर येथून उंटाचा डोंगर, अजिंक्यतारा किल्ला, चार भिंती या डोंगरी भागातून रस्ता काढून तो थेट रविवार पेठेला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या तडकाफडकी बदलीबाबत ते म्हणाले, मर्जी राखणाऱ्यांच्या कामांमध्ये काही अधिकारी प्रयत्न करतात तेव्हा लोकांची कामे होत नाहीत. जयवंशी यांची झालेली बदली संशयास्पद आहे. सातारा शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भातही उदयनराजे म्हणाले, अल्पवयीन मुलांना केवळ बालसुधारगृहात दाखल केले जाते. मात्र त्यांच्यावर कोणाचे प्रत्यक्ष नियंत्रण राहत नाही. यासंदर्भात मी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी बोललो आहे. अल्पवयीन मुलांच्या संदर्भातील कायद्यामध्ये बदलही केला पाहिजे.





